केडीएमसीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर आणि ज्येष्ठ अभ्यासु नगरसेवक मनपा क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात लोकल टच नेतृत्व असलेले राजेंद्र देवळेकर यांचे वयाच्या ५७ वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
त्यांच्या जाण्याने कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू, मनमिळावू आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, शहारांच्या समस्याची जाण असलेला व समस्या सोडवण्यासाठी अग्राही भुमिका घेत शहारातील विकास कामाबाबत पुढाकार घेणार लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. देवळेकर यांनी नगरसेवक, सभागृहनेता, स्थायी समिती सभापती, गटनेते, महापौर अशी सर्व मुख्य पदे भूषवली होती. तर देवळेकर यांच्या निधनाबाबत सर्वपक्षीय राजकारणी, लोकप्रतिनिधीनी सह तळागाळातील वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, महापौर विनिता राणे, नगरसेवक राजेश मोरे, दया गायकवाड, सचिन बासरे, सुधीर बासरे नगरसेविका छाया वाघमारे, भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
देवळेकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कार्यशील, अभ्यासू व्यक्तिमत्वं अकाली काळाच्या पडद्याआड गेलं आहे. कल्याण-डोंबिवलीतील नागरीकांना त्यांची उणीव सतत जाणवेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेंद्र देवळेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या निधनाने कल्याण शिवसेना परिवारात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेकरिता सदैव तत्पर, सुस्वभावी, मनमिळाऊ देवळेकर आज आपल्यात नाहीत हे यावर विश्वासच बसत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच देवळेकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो अशी भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment