Header AD

जागतिक हृदय दिन: स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदय विकाराचा धोका जास्त असतो का?


 ◆ लेखक – डॉ. सतीश जावली, कन्सल्टन्ट, कार्डिओ-थोरॅसिस सर्जरी, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आणि मुलुंड.... 

स्त्रिया व पुरुषांवर हृदयविकाराचा होणारा परिणाम वेगवेगळा असल्याचा निष्कर्ष अनेक वर्षांपासून होत आलेल्या विविध संशोधनांतून काढला गेला आहे. तुलनेने तरुण वयोगटांमध्ये पुरुषवर्गाला स्त्रियांच्या तुलनेत असलेला हृदयविकाराचा धोका खूपच जास्त असतो; सर्वसाधारणपणे हा आजार पुरुषांना वयाच्या 65व्या वर्षी गाठतो तर स्त्रियांना 72व्या वर्षाच्या आसपास या आजाराचा त्रास सुरू होऊ शकतो, असेही या संशोधनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. अलीकडच्या काळामध्ये वैज्ञानिक आणि चिकित्सकांनी ही संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत व्हावी या दृष्टीने प्रचंड आकडेवारी आणि माहिती सादर केली आहे, जसजशी याविषयीची अधिकाधिक माहिती उपलब्ध होत आहे, तसतसे लक्षात येऊ लागले आहे की हृदयविकाराला कारणीभूत ठरणारे घटक काळानुसार बदलत चालले असून वयाच्या अवघ्या चाळिशीमध्ये कार्डिओ-व्हॅस्क्युलर आजारांचा धोका असलेल्या स्त्रियांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. 


मध्यमवयीन पुरुषांना त्याच वयोगटातील स्त्रियांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण अधिक का असते याची निश्चत कारणे अद्याप सापडलेली नाहीत, मात्र उच्च रक्तदाब, रक्तातील शर्करेच्या प्रमाणात वाढ, कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, बैठ्या जीवनशैलीचा अंगिकार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि ताणतणाव ही हृदयरोगाचा धोका वाढविणारी कारणे स्त्री-पुरुष दोघांनाही लागू होतात. स्त्रियांच्या बाबतीत सांगायचे झाले तर पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसिज (PCOD), एन्डोमेट्रिऑसिस त्याचबरोबर गरोदरपणामुळे उद्युक्त झालेला मधुमेहाचा त्रास आणि उच्च रक्तदाब अशी काही केवळ स्त्रीवर्गाशी संबंधित आजार हृदयरोगाचा धोका वाढवितात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते एंडोमेट्रिऑसिसमुळे चाळीशीखालच्या स्त्रियांमध्ये CAD चा धोका 400% वाढत असल्याचे आढळून आले आहे. 


संशोधन अहवालांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. यातील स्त्रियांमधील लक्षणे सौम्य स्वरूपाची व निदान करण्यास कठीण असू शकतात – त्यामुळे ती सहजपणे नजरअंदाज होऊ शकतात किंवा दुर्लक्षिली जाऊ शकतात. छातीत दुखणे हे हृदयविकाराचे अगदी पहिले लक्षण मानले जाते व स्त्री-पुरुष दोघांमध्येही ते आढळते, मात्र स्त्रियांमध्ये छातीत अस्वाभाविक अस्वस्थता जाणवणे, धाप लागणे, अपचन, पाठदुखी इत्यादी सर्रास न आढळणारी लक्षणे दिसून येण्याची शक्यता अधिक असते. स्त्रियांमधील लक्षणांकडे लवकर लक्ष न जाण्यास कारणीभूत ठरणारे आणखी एक मोठे कारण म्हणजे स्त्रियांमध्ये हृदयरोगाचा धोका फक्त रजोनिवृत्तीनंतरच वाढतो हा सार्वत्रिक समज; यात तथ्य नाही आणि 35 वर्षांनंतर दरवर्षी स्त्रियांना हृदयाची तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. 


इथे सर्वात महत्त्वाचे आहे: 

- स्वत:चे संरक्षण करणे 

- नियमितपणे हृदयाची तपासणी करून घेणे आणि 

- तुम्हाला एखादे नेहमीपेक्षा वेगळे लक्षण जाणवत असेल तर, विशेषत: तुम्ही कमी वयात हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असणा-यांच्या गटात बसत असाल तर अशा लक्षणाविषयी डॉक्टरांना स्पष्टपणे सांगणे. 

 

हृदयविकाराच्या त्रासाचा धोका कमी करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचा निर्णय तुम्ही कोणत्याही टप्प्यावर घेऊ शकता. पुढील काही गोष्टी तुम्ही आपल्या डॉक्टरांच्या साथीने विचारात घेऊ शकता:

- वजन, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी या गोष्टींचे प्रमाण योग्य राखा. 

- वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित पद्धती अंगिकारत वजन कमी करण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये डॉक्टर आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्या. तुम्ही लठ्ठ असाल किंवा तुमचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर वजनाचे व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावेल. 


- रोजच्या रोज व्यायाम करा, दर दिवशी अर्धा तास ब्रिस्क वॉकिंग करणे अनिवार्य आहे. 

- धूम्रपान आणि मद्यपान सोडून द्या. 

- आपल्या आहारात फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि मासे या गोष्टी असायलाच हव्या. प्राणीजन्य उत्पादने आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. 

- मनावरील ताण कमी करण्यासाठी एखादा छंद जपा 

- योगासने, अरोबिक्स, ध्यानधारणा किंवा अशाप्रकारच्या इतर कोणत्याही प्रशिक्षणवर्गामध्ये प्रवेश घ्या. यामुळे आरोग्यपूर्ण जीवनशैलीच्या दिशेने जाणा-या मार्गावरून पुढे जात असताना तुम्हाला प्रेरणा मिळत राहील; ताणतणावांचा सामना करण्यासाठीही याचा फायदा होईल. 


कोव्हिड 19 पॅनडेमिकमुळे स्त्री-पुरुष दोन्ही लैंगिक गटांतील हृदयाचे आरोग्य पणाला लागले आहे आणि हृदयविकार असलेल्यांचा या आजारातून बरे होण्याचा प्रवास अधिक प्रदीर्घ आणि खडतर बनल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे आज कधी नव्हे इतके महत्त्वाचे बनले आहे. तेव्हा उशीर करू नका, आताच पाऊल उचला, आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला. 

--


जागतिक हृदय दिन: स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदय विकाराचा धोका जास्त असतो का? जागतिक हृदय दिन: स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदय  विकाराचा धोका जास्त असतो का? Reviewed by News1 Marathi on September 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

डॉलर घसरल्याने सोन्याच्या दरावर परिणा बेस मेटल व कच्च्या तेलाला आधार

  मुंबई, २६ नोव्हेंबर २०२० :  अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेले सोने इतर चलनधारकांसाठी स्वस्त झाले. या उलट, बेस म...

Post AD

home ads