Header AD

महामार्गानजीक कोविड हॉस्पीटलचे निविदाप्रक्रियेपूर्वीच काम सुरू

◆ ठाण्यातील धक्कादायक प्रकार, संजय वाघुलेंनी वेधले लक्ष...

ठाणे |  प्रतिनिधी  :  ठाण्यातील माजिवडा येथील महामार्गानजीक पार्किंगच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या १ हजार १७७ बेडच्या कोविड हॉस्पिटलचे कंत्राट भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच व निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काम सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे.
ठाणे महापालिका व सिडकोतर्फे पोखरण रोड नं. २ येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलच्या निविदेतील गैरप्रकारांवर काही दिवसांपूर्वीच नगरसेवक संजय वाघुले यांनी प्रकाश टाकला होता. त्यानंतर आता महामार्गानजीक ज्युपिटर रुग्णालयाशेजारील पार्किंगच्या जागेत उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयातील कंत्राटाचा गोंधळ उघडकीस आला आहे. 

ठाण्यातील बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालय, कळवा-मुंब्रा येथील रुग्णालय पूर्ण झाले आहे. आता पोखरण रोड क्र. २ येथील व्होल्टास कंपनीच्या जागेतील रुग्णालयाबाबत प्रक्रिया सुरू असतानाच, महापालिकेने माजिवडा येथील पूर्व द्रुतगती महामार्गालगत बहुमजली वाहनतळामध्ये १ हजार १७७ खाटांचे नवे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात अतिदक्षता कक्षात १९६ खाटांची उभारणी केली जाणार आहे. या कामासाठी २० कोटी ८४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

संबंधित रुग्णालयासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा सादर करण्यासाठी आज शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारपर्यंत मुदत होती. मात्र, संबंधित रुग्णालयाच्या ठिकाणी आज सकाळी काम सुरू झाले असल्याचे आढळले. भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रुग्णालयाच्या जागेला भेट दिली. त्यावेळी तेथे कामगारांकडून काम सुरू झाले असल्याचे आढळले. 

या प्रकरणी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. निविदेची प्रक्रिया सुरू असताना, थेट कामगारांकडून रुग्णालय उभारणीचे काम कसे सुरू करण्यात आले. निविदेविनाच कंत्राटदार काम कसे करीत आहे. महापालिकेच्या ताब्यातील वास्तूत पालिका अधिकाऱ्यांच्या परवानगीविना कंत्राटदार काम कसे सुरू करू शकतो, या प्रकाराला आशिर्वाद कोणाचा आहे, असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे.

----------------------------
चौकट
----------------------------
पालिकेकडून निविदेचा फार्स? : संजय वाघुले
पोखरण रोड क्र. २ येथील रुग्णालयाचे १२ कोटींचे काम तब्बल २२ कोटींपर्यंत गेले. या प्रकारावर चौकशीची मागणी करुनही महापालिका ढिम्म आहे. आता महामार्गानजीक रुग्णालयाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही, थेट काम कसे सुरू केले जात आहे. महापालिकेकडून निविदेचा फार्स केला जात आहे कि कंत्राट मॅनेज झाले आहे, असा सवाल भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.

 

महामार्गानजीक कोविड हॉस्पीटलचे निविदाप्रक्रियेपूर्वीच काम सुरू महामार्गानजीक कोविड हॉस्पीटलचे निविदाप्रक्रियेपूर्वीच काम सुरू Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads