कल्याण पूर्वेतील दवाखान्यात डिजिटल एक्सरे मशीनची व्यवस्था करा
◆कल्याण विकासिनी व कोरोना संघर्ष समिती कल्याण पूर्वची मागणी अन्यथा कल्याण विकासनी निधी उभारणार
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण पूर्वेतील गीता हरकिदास दलाल हा कल्याण डोंबिवली महानगपालिकेचा दवाखाना आहे. कल्याण पूर्वेत गेल्या सहा महिन्यात अनेक रुग्ण वाढले आहेत. असे असतांना याठिकाणी फक्त तपासणी व साधा उपचार करण्यात येत आहे. मात्र कोविड १९ संशयीत रुग्ण या दवाखान्यात जास्त जात आहेत. त्यामुळे या दवाखान्यात डिजिटल एक्सरे मशीनची व्यवस्था करण्याची मागणी कल्याण विकासिनी व कोरोना संघर्ष समिती कल्याण पूर्वने केली असून लवकरात लवकर डिजिटल एक्सरे मशीन न बसविल्यास कल्याण विकासनी हि संस्था यासाठी निधी उभारणार असल्याची माहिती माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिली.
कल्याण पूर्वेतील पालिकेच्या या दवाखान्यात काही खाजगी डॉकटर सेवा देण्यास तिथे जात आहेत. गेल्या काही महिन्यात एक्स रे काढण्याचे कोरोना संक्रमण कळतेय. असे लक्षात आल्यावर रुग्णांना एक्स रे काढण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे बऱ्यापैकी कोरोना परिस्थिती लक्षात येवू शकते व पुढील उपचार व उपाययोजना करता येवू शकते. परंतु एक्स रे करीता लोकांना एकतर खाजगी किंवा रुक्मिणी बाई कल्याण वेस्ट ला पाठवले जाते. याठिकाणी वेळ देखील जात असून एक्सरे मशीन देखील जुनी आहे. या सर्व परिस्थिती मुळे संशयीत रुग्णाकडून संक्रमण वाढले जात आहे.
पालिकेच्या दोन्ही रुग्णालयात डिजिटल एक्स रे मशीन ची व्यवस्था करण्याची सूचना अनेक डॉक्टरांनी पालिका आरोग्य अधिकारी व प्रशासनास केली आहे. परंतु पालिका या संदर्भात कोणताच निर्णय अद्याप घेवू शकली नाही. या जागतिक महामारी मधे पालिका प्रशासन व आयुक्त महामारी नियंत्रणासाठी उपाय योजना करण्यातले असे छोटे पाऊल उचलण्यास सहा महिने उशीर करणार असल्यास कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णाचा आकडा व मृत्यू आकडा वाढत जाणार असल्याची भीती उदय रसाळ यांनी व्यक्त केली आहे.
हि डिजिटल एक्सरे मशीन अवघ्या ५ लाखात येत असताना आयुक्त याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप रसाळ यांनी केला आहे. मशीन घेण्यात निधीची कमतरता असल्यास कल्याण विकासिनी अवघ्या पाच दिवसात निधी उपलब्ध करून देणार असून याबाबत पालिका आयुक्तांना व आरोग्य मंत्र्यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार यांनी देखील याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment