Header AD

ठाणे शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे अन्य यंत्रणांना आवश्यक निधी वर्ग करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

◆ एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्ते व पुलांची समस्या , दरवर्षी या यंत्रणांनी देखभाल व दुरुस्तीसाठी निधी एप्रिल महिन्यात ठाणे महापालिकेला वर्ग करावा ,महापालिकेने मे अखेरीस देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश...


ठाणे | दि १२ | प्रतिनिधी : ठाणे शहराच्या हद्दीतून एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा अनेक यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्ते जात असून त्यांच्या देखभालीचा भार ठाणे महापालिकेवर येत आहे. संबंधित यंत्रणांकडून वेळच्या वेळी या रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडून महापालिकेला टिकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी संबंधित सर्व यंत्रणांनी ठाणे महापालिकेकडे वर्ग करावा आणि ठाणे महापालिकेने या निधीतून रस्त्यांच्या देखभालीची कामे करावीत, असे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना शनिवारी दिले.

रस्त्यांची दुरुस्ती व देखभालीसंदर्भात श्री. शिंदे यांनी शनिवारी सर्व संबंधित यंत्रणांची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. ठाणे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. यातील तीन हात नाका उड्डाणपुल, कॅडबरी जंक्शन उड्डाणपुल, कापूरबावडी उड्डाणपुल, घोडबंदर रस्त्यावरील उड्डाणपुल, कापूरबावडी ते आत्माराम पाटील चौक (भिवंडी बायपास), मुंब्रा बायपास असे अनेक प्रमुख रस्ते एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अशा विविध यंत्रणांच्या अखत्यारीत असून या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती त्या संबंधित यंत्रणांनी करणे अपेक्षित आहे.

मात्र, ती वेळच्या वेळी होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो, तसेच टीकेचे धनी मात्र ठाणे महापालिकेला व्हावे लागते. त्यामुळे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सर्व संबंधित यंत्रणांची व्हीसीद्वारे बैठक घेतली. या वर्षीच्या पावसाळ्यात हाती घेतलेली कामे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावीत. मात्र, पुढील वर्षीपासून सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीत या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तरतूद करून ती रक्कम एप्रिल महिन्यात ठाणे महापालिकेकडे वर्ग करावी. त्यासाठी आवश्यक तो धोरणात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा. ठाणे महापालिकेने जानेवारी महिन्यातच या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भातील प्रक्रिया सुरू करावी आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी डागडुजीची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव महेश पाठक, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विनित शर्मा, एमएमआरडीएचे सहआयुक्त गोविंदराज, मुख्य अभियंता नारकर, एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

ठाणे शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे अन्य यंत्रणांना आवश्यक निधी वर्ग करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण निर्देश ठाणे शहरातील सर्व रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे  अन्य यंत्रणांना आवश्यक निधी वर्ग करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांचे महत्त्वपूर्ण निर्देश Reviewed by News1 Marathi on September 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads