प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी, शालेयमंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन
न्यूज१ मराठी । नेटवर्क
आ.संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी चर्चा
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीसाठी शासन निर्णय 23/10 प्रमाणे शाळा ही ’शाळा सिद्धी’ या उपक्रमात ’अ’ श्रेणीतच असायला हवी, ही अन्यायकारक अट तात्काळ रद्द करावी तसेच सरसकट वरीष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी संबंधित कालावधी पूर्ण केलेल्या व नियमात बसणार्या सर्व शिक्षकांना देण्याची मागणी करण्यात आली. राज्यभरात जिल्हापरिषद व महानगरपालिका तसेच नगरपालिका शाळांतील मुलींच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, ज्या ठिकाणी अद्याप मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, तेथे तात्काळ नवीन स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे, अशी माहिती संजय केळकर यांनी दिली.राज्यभरातील शाळांना गेली 4-5 वर्षे अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे शालेय खर्च भागवताना शिक्षकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे अनुदान सर्व शाळांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावे, अशी मागणी करण्यात आली. राज्यभरात जिल्हा परिषद शाळांमध्ये व प्रशासनात सद्यस्थितीत गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रीय प्रमुख, पदोन्नती मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक ही पदे रिक्त असून ती तात्काळ भरण्यात यावीत तसेच विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी तात्काळ लागु करण्याचा मुद्दाही यावेळी लावून धरण्यात आला. शेलार यांनी सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी, शालेयमंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:

Post a Comment