Header AD

हिंदू संस्कृती आणि स्त्री

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

समाजात स्त्रियांविषयी पूर्वी करण्यात आलेले विविध नियम नेमके काय आहेत? ते कोणी केले? कोणत्या ग्रंथात नेमका काय नियम सांगितला आहे? इत्यादीविषयी माहिती अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना आणि त्यातही अभ्यासकांना माहीत असेल. परंतु असे असले तरी स्त्रियांविषयीचे हे नियम समाजाच्या नसानसात इतके भिनले आहेत की माहितीतंत्रज्ञाच्या आधुनिक काळातही केवळ प्रथा, परंपरेच्या नावाखाली विविध चालीरीती बिनधास्तपणे सुरु आहेत. आज स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तरीही तिचे अस्तित्व मान्य केले जात नाही. तिचा ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क नाकारून तिला गुलाम म्हणूनच पहिले जाते. याचे कारण हजारो वर्षांच्या इतिहासात ‘स्त्री’ला हीन लेखण्याची प्रवृत्ती पानोपानी दिसून येते. ही प्रवृत्ती नेमकी काय होती, धर्मशात्रांमध्ये तिच्याविषयी सांगितलेले विधी, नियम यातून कशी अन्यायकारक, अमानुष वागणूक दिली गेली, सत्ता, संपत्ती, शिक्षण, कुटुंब, समाज या सर्वच क्षेत्रात पुरुषांना कसे श्रेष्ठत्व दिले गेले याविषयी इतिहासाच्या अगणित पानांमधून माहिती मिळविणे तसे खूप कठीण काम आहे. मात्र ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या पुस्तकात डॉ. आ.ह. साळुंखे यांनी आपल्या अविरत आणि सखोल अभ्यासातून अत्यंत सोप्या भाषेत आणि संदर्भासह या विषयाची मांडणी केली आहे. सर्वच धर्माशात्रांमध्ये स्त्रिला अत्यंत शुद्र स्थान दिलेले आहे. चार्वाकदर्शन मात्र यास अपवाद आहे. या पुस्तकाच्या लेखनाची प्रेरणा चार्वाकदर्शनच्या अभ्यासातून मिळाल्याचे आ.ह. यांनी नमूद केले आहे. चार्वाकदर्शनाने मांडलेले उमदे विचार भारतीयांनी स्वीकारले असते तर... असे त्यांना पुनःपुन्हा वाटत राहिल्याचे त्यांनी मनोगतात नमूद केले आहे. प्राचीन काळापासून स्त्रीला हीन लेखण्याची प्रवृत्ती पुरुषांच्या अणुरेणुमध्ये कशी रुजली आहे आणि त्या प्रवृत्तीमागे कोणत्या धार्मिक अंधश्रद्धा आहेत, हे जाणून घेतले असता त्या अंधश्रद्धा दूर सारून सध्याची परिस्थिती पालटण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो. प्रस्तुत पुस्तक हा या विश्वासाचाच एक अविष्कार आहे. या त्यांच्या मनोगतातून हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्दात्त हेतू आपल्याला लक्षात येतो. एकूण नऊ भागात या पुस्तकाची मांडणी केली आहे. शेवटच्या नवव्या भागात दिलेल्या संदर्भसूचीतून पुस्तकाचे प्रमाणीकरण तसेच साहित्यिक आणि अभ्यासिक मूल्य किती मोठे आहे हे लक्षात येते. प्रास्ताविकमध्ये अनेक संस्कृतींचा समुच्चय असलेली हिंदू संस्कृती, मातृसत्ताक पद्धत, आर्यांचे आगमन व त्यानंतर बदललेला दृष्टीकोन याविषयी थोडक्यात चर्चा केली आहे. तसेच स्त्रीविषयी असलेल्या विविध मुद्द्यांमध्ये स्थळ, काळ, वर्ण, जात, जमात, संप्रदाय इ. भेदांबरोबरच अंतर्विरोध, औदार्यातून अनर्थ दुबळी सद्भावना इ. चर्चा केली आहे.

हिंदू संस्कृती आणि स्त्री

भूतकाळातील हा इतिहास वाचून आता काय करायचंय? असे म्हणणार्‍यांची संख्या सध्या वाढत चालली आहे. परंतु हा भूतकाळ समजण्याची गरज का आहे याविषयी आ.ह. लिहितात ज्या धर्मावर व संस्कृतीवर स्त्रियांचे अथांग प्रेम असते, त्या धर्माने व संस्कृतीने त्यांना नेमके काय दिले आहे, हे त्यांचे त्यांनाही कळले पाहिजे. या भूतकाळाचे जे अनंत थर पुरुषांच्या अंतर्मनात धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांच्या स्वरुपात साचले आहेत, ते खरवडून काढण्याला मदत व्हावी, म्हणून पुरुषांनाही हा भूतकाळ समजण्याची गरज आहे. 
केवळ जन्मापासून मृत्युपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये नव्हे तर जन्माआधीच्या गर्भास आणि मृत्यूनंतरच्या काळातही स्त्रियांना हीन लेखले जाते. या अनुषंगाने स्त्रीला जन्माच्या आधीपासून, उपनयन, विवाह, वैवाहिक जीवन, वैधव्यानंतर आणि एकूनच जीवनव्यापी गौणत्व कसे दिलेले आहे याविषयी प्रकरण दोन ते सात यामध्ये विविध उदाहरणे देऊन चर्चा केली आहे. ‘जन्माच्या आधीपासून’ या प्रकरणात पुत्रच हवा ही प्रवृत्ती, गर्भधारणा, डोहाळे, प्रसूतीपूर्व, प्रसुतीनंतर, जातकर्मादी संस्कार, पुत्रमहिमा, कन्यानिंदा याविषयी विविध विधी आणि संस्कार याविषयीचे विवेचन वाचायला मिळते. याचबरोबर उपनिषदातील मुलगी व्हावी म्हणून सांगितलेल्या विधीचीही चिकित्सात्मक चर्चा केलेली आहे. ‘उपनयन’ या संस्काराविषयी तिसर्‍या प्रकरणात स्त्रियांच्या उपनयनाविषयी चर्चा केली असून गार्गी, मैत्रेयी यांच्याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. चौथ्या प्रकरणात विवाह या संस्काराविषयी चर्चा करताना विवाहाची अपरिहार्यता, विवाहाचे वय, वधूची निवड, अंधश्रद्धा, विवाहाचे प्रकार याविषयी चर्चा केलेली आहे. पाचव्या प्रकरणात वैवाहिक जीवनात स्त्रीने कसे वागावे, तिचे दैनंदिन आचरण, रजस्व, ऋतुकाळ, वंध्यत्व, घटस्फोट, बलात्कार, अहेवामरण इ. विषयी चर्चा केलेली आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीत विधवा स्त्रियांची परिस्थिती किती दैनानीय होती याविषयीचे विवेचन ‘वैधव्यानंतर’ या प्रकरणात दिले आहे. यात वैदिक काळात पुनर्विवाह करण्याची पद्धत, त्याला लावलेले आणि नंतरच्या काळात बदलत गेलेले नियम याचबरोबर सती, जोहर या प्रथाविषयी चर्चा केलेली आहे. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जीवनाच्या विविध अवस्थेत तिच्या वाट्याला आलेले कडक नियम, यातून आलेले एकूण जीवनव्यापी गौणत्व याविषयी सातव्या प्रकरणात चर्चा केलेली आहे. यात चार आश्रम, तीन ऋणे, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, ईश्वर व अवतार, चार पुरुषार्थ, चार वर्ण, निर्मितिविषयक पुराणकथा या संकल्पनांच्या संदर्भात स्त्रीविषयक मूल्यांचे संक्षिप्त विवेचन केले आहे. विविध स्कंदपुराण, ब्रह्मपुरण अशी विविध पुराणे, नारदस्मृती, मनुस्मृती या स्मृती, श्रुती, धर्माशात्रांबरोबरच भास, कालिदास, वात्सायन, बाणभट्ट, विविध शास्त्रकार महानिर्वाण तंत्र सारखे तंत्रमार्ग यातील विविध सिद्धांतांची उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण असे विवेचन केले आहे. याचबरोबर अलीकडच्या काळातील काही अभ्यासकांच्या याविषयावरील दृष्टीकोनावर चर्चा केली आहे. चांगल्या सिद्धांतांचे अर्थाचे अनर्थ कसे केले आहेत हे ही आ.ह. यांनी काही उदाहरणांमधून दाखवून दिलेले आहे. या पुस्तकाचे एक वैशिष्ट्ये म्हणजे अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा यांचे विवेचन करताना काही चांगल्या प्रवृत्तींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. याचे उदाहरण म्हणजे कौरवांनी द्रोपदीचा अपमान केल्यानंतर भीमाने तिला उमदेपणाने दिलेली वागणूक याविषयी आवर्जून लिहिले आहे. सीतेचे अग्निदिव्य ही नंतर घुसवलेली गोष्ट यावर चर्चा केली आहे. पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक दिली जात असल्याचे सांगताना काही उदाहरणे आवर्जून दिली जातात. त्यामधील भूमिकांच्या दुसर्‍या बाजूचे सखोल विश्लेषण आ.ह. यांनी केलेले आहे.     
     
या पुस्तकाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हिंदुं समाजाव्यतिरिक्त वेगवेगळ्या समाजाने स्त्रियांच्या बाबतीत कोणकोणती भूमिका घेतली आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला आहे. यामध्ये पारशी, यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, जैन, बौद्ध या समाजातील स्त्रीयांना दिलेले स्थान याविषयी चर्चा केली आहे. एकूणच जगातील सर्व पुरुषप्रधान समाजांमध्ये पूर्वीच्या काळी स्त्रीला अत्यंत हीन दर्जा दिल्याचे, अत्यंत कनिष्ठ, गौण स्थान दिल्याचे आणि आजही त्याचा प्रभाव टिकून असल्याचे दिसते. इसवीसन पूर्वीपासून विविध कालखंडात हिंदू संस्कृतीतील स्त्रियांच्या परिस्थिती आणि त्यांच्याविषयी नेमकी विचार काय होते याविषयी अत्यंत सध्या सोप्या भाषेत आणि  एकाच दृष्टीक्षेपात सादोहरण माहिती आणि त्याचे विवेचन केलेले असे हे एकमेव पुस्तक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा याचा पगडा आजही बहुतांशी समाजावर आहे. हे कटू असलेले आणि न स्वीकारले जाणारे सत्य आहे. म्हणूनच आजच्या समाजमनाची आणि त्यातही विशेषत: पुरुषांची पूर्वग्रहदूषित जडणघडण बदलायची असेल तर सर्वांनीच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.
हिंदू संस्कृती आणि स्त्री हिंदू संस्कृती आणि स्त्री Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads