Header AD

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 


घरगुती प्रदूषण व विशेषतः गावांतील घरांत चुलीमधे काटक्या जाळणे जबाबदार असल्याचा कांगावा करण्यात आला. गेल्या काही दशकांत औद्योगिकरण व शहरीकरणामुळे वाढणार्‍या वायूप्रदूषणाला लपवण्यासाठी असाच गैरसमज पसरवण्यात आला होता. आदिवासी जंगल तोडतात असा अनेक शहरी माणसांचा ठाम समज असतो. त्यांनी  काटक्यांच्या मोळ्या डोक्यावर घेऊन भरभर चालणार्‍या आदिवासी महिला पाहिलेल्या असतात. पण या महिला या मोळ्या कुणाला व का विकतात, याचा शोध ते घेत नाहीत.
एक साधा विचारही त्यांच्या मनात येत नाही की गावातील शेतकरी व इतरांनी आणि आदिवासींनी जंगल तोडले असते व म्हणून जंगल नष्ट होत असते तर भारतात 60 वर्षांपूर्वी व पृथ्वीवर उद्योगपूर्व 250 वर्षांपूर्वी जे घनदाट जंगलांचे आवरण होते ते तसे उरलेच नसते. तुम्ही शहरी माणसेदेखील या काळापूर्वी शेतात, गावात व जंगलातच होता. याचा एवढ्या लवकर विसर पडला?
जंगले, औद्योगिकरण, शहरीकरण व ठोक राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे संपली व वायू, जल व भूमीप्रदूषणही त्यामुळेच झाले. काटक्या जाळून चूल पेटवल्याने नाही. जेव्हा स्वयंचलित यंत्र, वीज व सीमेंटसारख्या विध्वंसक गोष्टी आल्या नव्हत्या, तेव्हा जंगल एवढे विपुल होते की शेकडो वर्षे काटक्या जाळल्याने ना जंगल कमी होत होते, ना चुलीतून निर्माण झालेल्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे व शेणातुन निर्माण होणार्‍या मिथेनमुळे वातावरण बदल होणार होता. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूचे 280 पीपीएम (1 पीपीएम = 300 कोटी टन) हे प्रमाण स्वयंचलित यंत्र येईपर्यंत स्थिर होते. त्यानंतर गेल्या 250 वर्षांत औद्योगिकरणाबरोबर ते वाढत गेले. म्हणून हा केवळ चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा प्रकार आहे.
काटक्या, गोवर्‍या जाळणार्‍या मातीच्या चुली या पृथ्वीच्या आकृतिबंधाचा भाग होऊ शकतात पण गॅसचे तसे नाही. तो औद्योगिकरणाच्या विनाशकारी विध्वंसक व पृथ्वीविरोधी चौकटीचा भाग आहे.
स्वयंचलित यंत्र चालवण्यासाठी लागणार्या ऊर्जेचे स्त्रोत म्हणून प्रथम सरळ जंगल, मग कोळसा, तेल व वायूसाठी नंतर अणुऊर्जा आल्यावर युरेनियमच्या खाणींसाठी व अणु इंधन चक्रातील खनिज इंधनांसाठी, खाणकामासाठी जंगल तोडले गेले. मोटार, विमान व इतर वाहने रस्ते, महामार्ग, धरणांसाठी, सीमेंट, स्टील व शहरीकरणाच्या गृहनिर्माणासाठी, बांधकाम साहित्यासाठी सीमेंट, लाद्या, ग्रेनाईट, मार्बल इ. फ्रीज, वॉशिंग मशिन, ए सी, कपाटे व इतर हजारो वस्तुंसाठी उद्योगांसाठी, शिवाय या शहरीकरणाला अन्न पुरवण्यासाठी नगदी पिके लावण्यासाठी, अशा औद्योगिकरणनिर्मित अनेक कारणांनी क्षणोक्षणी जंगल नष्ट केले जात राहिले.
चुली आणि ज्वलनाच्या सिलिंडरमधून पुरवला जाणारा वायू यांचा विषय मुळात तेलाच्या उत्खननाशी संबंधित आहे. तेल उत्खनन हे मुख्य मोटार, बाईक, विमान, जहाज, जनरेटर व इतर यंत्रे यासाठी होते. यातही जवळजवळ 80 ते 90% वाटा फक्त मोटारींचा आहे. यासाठी 8 ते 9 कोटी बॅरल तेलाचे पृथ्वीच्या पोटातून रोज उत्खनन होत आहे. ते वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रक्रिया करणार्‍या रिफायनर्‍या वार्षिक कोट्यावधी टन प्रदूषण करत राहतात. मोटार, जहाज व विमानांसाठी लागणारे तेल, हे तेल उद्योगाचे नफ्यासाठी मुख्य लक्ष्य आहे. त्यात वाया घालवत असलेल्या रॉकेल व वायूचा घरगुती इंधनासाठी उपयोग करून फार उदात्त कार्य केल्याचा आव आणला जातो.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

जेव्हा ही इंधने पुरवली जात नव्हती तेव्हा उलट शेतकर्यांना सर्पणासाठी काटक्या आणि काटक्यांसाठी झाडे आवश्यक वाटत होती. वायू (गॅस) व रॉकेल मिळू लागल्यावर त्यांची मानसिकता बदलू लागली. याच काळात ‘टी व्ही’ सारख्या साधनाचे आगमन झाले. एक वेगळी उपभोगवादी संस्कृती त्यांच्यासमोर सतत येऊ लागली. ही शहरी- औद्योगिक संस्कृती श्रेष्ठ आहे असे गावांच्या मनावर बिंबवले जात राहिले. शिक्षण तर त्यासाठीच आणले होते. सन 1990 मधे जागतिकीकरण म्हणजे, औद्योगिकरण जागतिक करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले. कारण जीडीपीच्या वाढीवर आधारित, नैसर्गिक संसाधनांची व बाजारपेठांची अनिर्बंध भूक असलेल्या अर्थव्यवस्थेची ती न संपणारी मागणी होती.
म्हणूनच थायलंडच्या एका निमशहरात सन 1991 मधे जागतिक बँकेतर्फे जगातील बँकांना बोलावून महत्त्वाची बैठक झाली. त्यात भारतासारख्या देशांत औद्योगिकरणासाठी मानसिकता घडवणारे मुख्य आयुध असणार्या शिक्षणाचा प्रसार जोरात करण्याचे ठरले. त्यातून ‘सर्व शिक्षा अभियान’ आले. त्यात काँप्युटरने मनावर गारूड केले होते. त्यामुळे इंग्रजी माध्यमाकडे लोंढे वाहू लागले. आपण काय करत आहोत यावरचे भारतीय समाजाचे नियंत्रण संपले. विनोबा आपल्या ‘वेदांचे सार’ या पुस्तकात भगवंताचे एक नाव पुरंदर म्हणजे शहरे, नगरे तोडणारा, असे आहे हे आवर्जून नमूद करतात. शहरांना नाकारणारे हे भारतीयांचे सहस्त्रकांचे ग्रामीण शहाणपण लोपले. शेती संस्कृतीचा व पर्यायाने शाश्वततेचा अंत सुरू झाला.
याचा परिणाम म्हणून नव्या जगात दाखल होण्याची घाई झाली. प्रसारमाध्यमे, त्यांचे नेमलेले संपादक व तथाकथित विचारवंत यात बहकवण्याची भूमिका करत आले आहेत. मग जो ज्या मार्गाने जमेल तसा पैशाच्या मागे लागला. पैसा म्हणजे यश, पैसा म्हणजे प्रतिष्ठा, पैसा म्हणजे सर्वकाही अशी झिंग आली. नव्हे अर्थव्यवस्थेच्या सूत्रधारांनी आणली. सर्व निसर्गाधारित वा कृषिप्रधान समाजांमधे आपण अविकसित आहोत असा न्यूनगंड पेरला.
यातुन भौतिक सुखाची साधने आपणाकडे असावी असे वाटून, आणि अनेकांनी रासायनिक शेतीमुळे उत्पादनखर्चाने व जमिनीचा कस गेल्याने डबघाईला आल्याने, झाडे तोडण्याचा सोपा मार्ग स्वीकारला. विकासाच्या नावे होणार्‍या धरण व इतर प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांनाही, जगण्याची पद्धती मोडल्याने या झाड विकण्याच्या मार्गाकडे वळावे लागले.  आधीची शेतीची पार्श्वभूमी नसलेले लाखो लोक औद्योगिक रासायनिक तंत्रज्ञान शेतीत शिरल्यानंतर नव्याने शेतीत आले. त्यांना रासायनिक शेतीच फक्त माहित आहे. असे आदिवासीही आहेत. जमीन हक्क कायद्यात बसावे म्हणून अलिकडे आदिवासींकडून जंगल तोडले जाते. हे पुन्हा औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेचे दुष्परिणाम आहेत. याने माणसाला पृथ्वीच्या म्हणजे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या विरोधात उभे केले आहे. बहुतांश माणसांना याची जाणीव नाही.
चुलीत काटक्या जाळल्याने फारतर धूर गेल्याने डोळे चुरचरतात, खोकला येतो. आता तोही होत नाही, कारण वायूवीजनाचा विचार करून धूररहित चुली बनल्या आहेत. पण चुलींमुळे क्षय होतो असा तद्दन चुकीचा प्रचार केला गेला. देशात क्षयाचे सर्वाधिक रूग्ण मुंबई शहरात आहेत. मुंबईत तर काटक्या जाळणार्‍या चुली नाहीत. हो, मोटारींचे व बांधकामाच्या सीमेंटमिश्रित धुळीचे प्रचंड प्रदूषण मात्र आहे.
उद्योगपूर्व काळात कॅन्सरचे प्रमाण 1 ते 10 लाखांत एक असे होते आज ते जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे 5 माणसांत एक असे आहे. पुढील पाच वर्षांत तीन माणसांमध्ये एक असे होणार आहे. याला गावे, त्यांचे चुलीत काटक्या जाळणे वा शेणाच्या गोवर्‍या जाळणे हे कारण नाही. कॅन्सरचे मुख्य कारण परत मोटार आहे. त्यापाठोपाठ इतर वाहनांचे प्रदूषण, रासायनिक खते, कीटकनाशक इ. मिश्रित अन्न, अणुभट्ट्यांचा किरणोत्सार, औष्णिक विद्युत प्रकल्पांचे, सीमेंटचे प्रदूषण, औद्योगिक जीवनशैलीचे तणाव, तंबाखू व इतर व्यसने इ. कारणे आहेत. जसा पृथ्वीच्या जडणघडणीचा र्‍हास होत आहे तसे या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
तथाकथित आधुनिक औद्योगिक जग डोक्यावर उभे आहे. म्हणून त्याला सर्व उलट दिसत आहे व दिसणारे जग बरोबर वाटत आहे. या जगाला सुलट करून पायावर उभे करण्याची गरज आहे. म्हणजे त्याला खरे योग्य आकलन होईल. अनेक माणसांना पृथ्वीवर काय घडते आहे याचा विचार करण्याची गरज यापूर्वी वाटली नव्हती. ते तंत्रज्ञानामुळे हरखुन गेले होते. आजही अशी माणसे तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याची चूक करत आहेत व पाश्चात्यांप्रमाणे जीवनशैली व जीवनाच्या उच्च दर्जाच्या, प्रगतीच्या सापळ्यात अडकली आहेत. औद्योगिक युग ही मानवजातीची अक्षम्य चूक आहे ही गोष्ट अजूनही त्यांच्या पचनी पडत नाही. पण, आता आपल्या आवडी निवडीचा प्रश्न उरलेला नाही. कोपर्निकस ब्रूनो गॅलिलिओचा निखळ वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विज्ञान मानले तर औद्योगिकरण तात्काळ थांबवून कृषियुगात परत जावे लागेल. यासाठी दोन तीन वर्षांचाही उशीर झाल्यास परतीची वाटही बंद होईल कारण तापमानवाढीमुळे पृथ्वी आपली जैविक विविधता, अन्न उत्पादन व पाण्याची क्षमता दिवसेंदिवस गमावत आहे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads