Header AD

देश मरणाच्या दारात उभा न्यूज१ मराठी । नेटवर्क 

गेल्या दोन-सव्वा दोन वर्षांपासून सायनमध्ये छोट्याश्या खोलीत जगणार्‍या अजितकुमार पासवानने शेवटचा श्वास घेतला. त्याचं पार्थिव त्याच्या नात्यातल्या एकाने क्लेम केलं. एव्हाना चैत्यभूमीवरच्या शवदाहीनीत त्याची पावडरही झाली असेल. सुटला एकदाचा. त्याला पहिल्यांदा भेटलो होतो 2014 साली. धडधाकट होता. गोरापान होता रंगानं. पांढरं शर्ट, काळी पँट घालायचा. अस्खलित इंग्रजी बोलायचा. शिक्षण घेतलेलं आर्किटेक्चरचं. पण सुरुवातीला उमेदीच्या दिवसांत दहा बारा डिजाईन बनवल्या असतील तेवढ्याच काय ते. नंतरच्या उर्वरित आयुष्यात कधीच डिजाईन बनवलं नाही. डिजाईन बनवायचं सोडलं नी त्याचं आयुष्य श्रीमंत झालं. बोलायला हुशार. इंग्रजी, हिंदी आणि ऊर्दूवर जबरदस्त कमांड. कागद खुप शिताफीने लिहायचा. त्याने लिहीलेला अर्ज, लिहीलेले आर्ग्युमेंट खोडून काढताना अनेकदा लोक चक्रावून जायचे. म्हणून डिजाईनिंगचं काम सोडून नोएडा वगैरे परिसरात फसलेल्या प्रोजेक्ट्सना कायदेशीर करून घेण्याचं, फॉरेस्ट लँडला रेसिडेंशल झोन बनवून घेण्याचं, सर्व लीगल अप्रुवल मिळवण्याचं नवीन स्टार्ट अप त्याने सुरू केलं.आईच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजितकुमारची मुलगी अंकिता आणि मुलगा अंकित दोघेही घरी आले होते. महिनाभराचा अवकाश होता. सुट्ट्या होत्या. अंकिता आणि तिची आई दोघीही प्रचंड सुंदर होत्या. अंकितही बापासारखाच रुबाबदार. चारचौघात सहज उठून दिसतील असेच होते ते सगळे. नेमकं या सौंदर्याच्या मागे वेडा झालेला एक गौरक्षक अंकिताच्या मागे लागला. रस्त्यात अडवणं, चिडवणं, हात पकडणं, धमकावणं सुरू झालं. या विरोधात अजितकुमारनं थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सेटलमेंट करून प्रकरण मिटवा म्हणून सांगितलं. दलाच्या लोकांना कोण अंगावर घेईल या भीतीने पोलिसही गप्प होते. प्रकरण संपलंय असं समजून शांत झालंय म्हणून पासवान कुटूंब निर्धास्त होते. आईचा वाढदिवसही झाला होता. मुलांच्या सुट्ट्या संपायला आल्या होत्या. पण, इथं कुटुंब निर्धास्त झालं असलं तरी गौरक्षक काही निर्धास्त नव्हता. त्याला दुःख नव्हतं, चीड होती त्याला नाकारले गेल्याची. ते ही एका स्त्रीकडून. तीचा बलात्कार केल्याशिवाय आपल्या अपमानाचा बदला मिळणार नाही या सूडभावनेने पेटलेल्या त्याने आणि त्याच्या साथी दहशतवाद्यांनी मॉब लिंचिंगचे जे पॅटर्न सेट केले होते त्या पॅटर्ननुसार आधी इलाख्यातील लाईट घालवली. डीपीचे ऑईल लीक केले. अंधार होऊ दिला. बॅटरीवर मंदिराचे लाऊडस्पीकर चालू केले. पासवान कुटूंबियांच्या नावाने आरोळी दिली गेली. हेच ते लोक रोज गोमांस आणून शिजवतात. आपला धर्म भ्रष्ट करतात. यांना शिकवण्याची हीच ती वेळ म्हणून भारतमाता की जय चे नारे दिले गेले. म्हणता म्हणता गायगुंडाची दहशतवादी तुकडी घराचा दरवाजा तोडून आत घुसली. घोषणांच्या आवाजाने भयभीत झालेले चौघेही पासवान घरात मिळेल त्या ठिकाणी लपून बसले होते. पण शेकडोंच्या जमावापुढे चौघांचा निभाव लागेल तरी कसा. मुलाच्या डोक्यात स्टंप घालून मारून टाकलं. आईला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. आणि मुलगी अंकिता हीच्या अतिप्रसंग ओढावला. तिचाही त्याच रात्री खून केला गेला. अजितकुमारला घराच्या दुसर्‍या माळ्यावरून खाली फेकलं. पण तो मरणार नाही याची दक्षताही घेतली गेली. तो मेला नाही. पण अर्धमेला जगत राहीला. राग होता त्या दहशतवाद्यांना त्यांच्या विरोधात पोलिसांत गेल्याचा. त्यांना पोलिसांसमोर झापल्याचा. लिटिगेशनच्या कामात उपयोग येणार्‍या मिनिस्टरचा वापर करून त्या गुंडांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केल्याचा. 

युपीत मॉब लिचिंगमध्ये जे 57 लोक मारले गेले त्यात पासवानांची तीन माणसं ही होती. जी आज चार झाली. आजपर्यंत कुणालाही मॉब लिंचिंगमध्ये शिक्षा झालेली नाही. यापुढेही ती होणार नाही. ती होईल अशी अपेक्षा देखील नाही. मंदिरं, मंदिरांचे भोंगे हे मशीदीतल्या भोंग्यांना उत्तर म्हणून उभे राहीले. आज तेच भोंगे वाजू लागले की त्यावर आरतीच वाजेल याची ग्यारंटी नसते. भारतमाता की जयचे नगाडे वाजू लागले की समजून जायचं. भारतमातेच्या जयघोषात आज कुणीतरी पुन्हा सांस्कृतिक दहशतवाद्यांनी रचलेल्या होळीत सती घातलं जाणार आहे. त्या आरोळ्या त्यासाठीच आहेत... कारण त्या आगीत होरपळणार्‍या जीवांचा आवाज आपल्या कानांपर्यंत यायला नकोच. अशा मातेनं मरून जावं. जी आई लेकारांच्या वाचवण्याच्या कामी न येता मारण्याच्या कामी येत असेल तर तीनं बेशक मरून जावं. अशीही प्रत्येकाची आई मरतच असते कधी ना कधी. हा देश मरणाच्या दारात उभा आहे. तो मरण्याआधी तरी ...

॥जयतु जयतु हिन्दू राष्ट्रम्।
देश मरणाच्या दारात उभा देश मरणाच्या दारात उभा Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads