Header AD

ग्रंथालय शास्त्राचे जनक : डॉ.एस.आर.रंगनाथन न्यूज१ मराठी । नेटवर्क

डॉ.एस.आर.रंगनाथन यांना देशातील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते.यांचे संपर्ण नाव सियाली रामामृत रंगनाथन असे आहे.आपल्या दक्षिण भारतात चेन्नई शहराजवळ तंजावर नावाचा एक जिल्हा आहे.या जिल्ह्यातील शियाली येथे 12 ऑगस्ट 1892 मध्ये रंगनाथन यांचा जन्म झाला.यांचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. सन 1908 पर्यंत रंगनाथन यांचे शालेयशिक्षण गावीच पूर्ण झाले.त्यानंतर चेन्नई मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागले. रंगनाथन विचार करू लागले ज्या ग्रंथाच्या आधारे प्राध्यापक आपल्याला शिकवतात त्या मूळ ग्रंथाचेच वाचन आपण केले पाहिजे.हा विचार दिवसागणिक दृढ होत गेला. ग्रंथालयात तासनतास बसू लागले इंग्रजी वाड्मय घेऊन बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.सारे आयुष्य ग्रंथालयाशी एकरूप होण्याचे बीज जणू इथेच रुजले गेले.चेन्नई सरकारच्या शिक्षण विभागात त्यांनी इ.स.1917 ते 1920 या कालावधीत गणिताचे प्राध्यापक म्हणून आपले जीवन व्यतीत केले.

ग्रंथालय शास्त्राचे जनक :  डॉ.एस.आर.रंगनाथन

मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल- श्री रंगनाथन यांना मद्रास विद्यापीठातील जागा रिकामी झाल्याचे समजले.प्रामाणिकपणा, जिद्द, आत्मविश्वास या बळावर सर्व संकटावर मात करीत 4 मार्च 1924 रोजी रंगनाथन यांनी ग्रंथपालाची जबाबदारी स्वीकारली.लंडन येथील जागतिक किर्तीच्या ब्रिटीश म्युझियम या विशाल ग्रंथालयातील कामकाजाच्या पद्धतीचे अध्ययन करण्यासाठी प्रा.रंगनाथन यांना लंडन येथे पाठविण्यात आले. रंगनाथन आता कुशल आणि सक्षम ग्रंथपाल होण्यासाठी सिद्ध झाले. इ.स.1850 साली इंग्लंडमध्ये सर्वप्रथम सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात आणला तो श्री. एडवर्ड एडवर्डस यांनी. सार्वजनिक ग्रंथालय कायद्याचे ते प्रथम शिल्पकार आहेत. अशा ज्ञानमहर्षीचा रंगनाथन यांनी परिचय करून घेतला. भारतीय भाषा आणि भारतातील विशिष्ट विषयांच्या ज्ञान भांडारांच्या वर्गीकरणास सद्यस्थितीत उपलब्ध असणार्‍या पद्धतींपैकी कोणतीही एक पद्धत लागू करणे अश्यक्य आहे याची श्री. रंगनाथन यांना जाणीव झाली.म्हणून त्यांनी या बाबतीत गुरुवर्य सेयर्स यांचा सल्ला घेतला.इंग्लंडहून परत येताना श्री.रंगनाथन यांनी बोटीवरच द्वि-बिंदू वर्गीकरण पद्धतीचा आराखडा तयार केला.

    इ.स.1925 च्या जुलै महिन्यात मद्रासला परत आल्यानंतर त्यांनी द्विबिंदू वर्गीकरणाला सुरुवात केली.सार्वजनिक ग्रंथालयासंबंधीजिव्हाळा आणि आत्मीयता असणार्‍या व्यक्ती आजपर्यंत कधीच एकत्र आल्या नव्हत्या. आत्तापर्यंत भारतात कोठेही ग्रंथपालाची स्वतंत्र अशी संघटना कधीच स्थापन झाली नव्हती. श्री रंगनाथन यांनी ग्रंथपालांच्या संघटनेचे प्रत्यक्ष महत्व इंग्लंडमध्ये अनुभवले होते. सार्वजनिक ग्रंथालयाची सर्वांगीण प्रगतीसाठी 30 जानेवारी 1928 रोजी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. यात श्री रंगनाथन यांनी स्वत:च पुढाकार घेतला. इथेच ग्रंथालय शास्त्राचा वर्ग प्रथम सुरु झाला.
   जागतिक कीर्तीचे ग्रंथपाल डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राविषयी अनेक ग्रंथ लिहिले आहेत.त्यांनी ग्रंथालय शास्त्राची मुलतत्वे विशद करणारा ‘ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत’ हा ग्रंथ 1931 साली लिहिला.कोणत्याही शास्त्राचे जसे काही सिद्धांत असतात आणि त्या सिद्धांतानुसार त्या शास्त्राची उभारणी झालेली असते. तसे ग्रंथालय शास्त्राचे काही सिद्धांत आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या ग्रंथालयात आपल्या वाचकांना अधिकाधिक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या सिद्धांताचे पालन करावयास हवे असे प्रतिपादन डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी आपल्या ग्रंथात केले आहे. कोणत्याही ग्रंथालयाचे उद्दिष्टे हे आपल्या वाचकांचे समाधान करणे हे असले पाहिजे व त्यासाठी पाच मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला पाहिजे. ग्रंथालयाची निर्मिती करताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात? ग्रंथालयाचा अधिक वापर होण्यासाठी काय करायला हवे? वाचकांच्या गरजा कशा भागविता येतील? या ग्रंथालयाशी निगडीत असलेल्या सार्‍या प्रश्नांचा उहापोह या पंचसुत्रांच्या अनुशंगाने केला आहे. ही सूत्रे पुढीलप्रमाणे.- 1 ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. 2 प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. 3 प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजेत. 4 वाचकांचा वेळ वाचला पाहिजेत. 5 ग्रंथालय हे वर्धिष्णू आहे. ब्रिटीश राष्ट्रीय सूचित वर्गीकरणाची पाच मुलतत्वे मान्य केली गेली आहेत. ही सूत्रे प्रत्येक ग्रंथालयात उपयोगात आणली जातात आणि आणली गेली पाहिजेतच. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्रातील आणि ग्रंथालय चळवळीतील मौलिक कामगिरीबद्दल दिल्ली विद्यापीठाने त्यांना 7मार्च1948 रोजी डॉक्टर ऑफ लेटर्स ऊ.ङळीींं ही बहुमानाची पदवी देऊन सन्मानीत केले.


अशा या थोर सुपुत्राचा मृत्यू 27 नोव्हेंबर 1972 या वर्षी वयाच्या 80व्या वर्षी बंगलोरमध्ये झाला. उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवकांसाठी डॉ.एस.आर.रंगनाथन पुरस्कार देण्याची अभिनव योजना सन 1992-93 पासून सुरु केली आहे.ग्रंथालय संवर्धन या एकाच ध्येयाने प्रेरित जीवन जगलेल्या या थोर महापुरुषाची स्मृती आपणा सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.


ग्रंथालय शास्त्राचे जनक : डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथालय शास्त्राचे जनक :  डॉ.एस.आर.रंगनाथन Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

वी फाउंडर सर्कलची काऊच फॅशन मध्ये १.५० लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक

  मुंबई, २४ फेब्रुवारी २०२१ :  वी फाउंडर सर्कल (डब्ल्यूएफसी) ह्या स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यावरील स्टार्ट अप्...

Post AD

home ads