Header AD

संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला; आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो, आणि आपण संतांना नावे ठेवतो. एकजण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता; अपकार करणार्‍यावरही उपकार करायला सांगून आम्हांला मेषपात्र करता. वास्तविक, आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. ‘राम कर्ता’ या भावनेने त्यांनी कर्म केले; आपण ‘मी’पणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही; आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही !

संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात

एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदु:खाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदु:खात गुरफटून जातो. संताचे अंत:करण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वादरूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान् नसतात. अती विद्वान् मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कुणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला-वाचायलाही येत नाही, असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते.

लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की, मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा, आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला; परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले; एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे संदर्भ निर्माण केले; आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला, त्याला काही कमी पडणार नाही; नेहमी समाधानच राहील.

जग संतांशिवाय असणे शक्य नाही; 
आम्हांला त्यांना ओळखता येत नाही.
संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads