Header AD

राजकारणात कार्यकर्त्यांचे व त्यांच्या मुलांचे शेवटी काय होते?

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

कार्यकर्ता.......
गरीबांचा बुलंद आवाज.....
साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा.........
नाद नाय करायचा वाघाचा... 
येऊन येऊन येणार कोण??
घोषणांनी समीरचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच-सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं समीरला करावी लागायची. साहेबांचा समीरवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता....
पक्षाचं काम करताना समीरचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही.....
मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण. साहेब गाडीतून उतरले. फटाक्याच्या माळा पेटल्या. कार्यकर्त्यांचे अंतकरणापासून आभार. असेच पाठीशी रहा. सेवा करण्याची संधी द्या. भावपूर्ण भाषण संपले. साहेब मुंबईला रवाना झाले.......
महिन्या दोन महिन्यांतून साहेब तालुक्याला येतात. समीरला साहेबांची सगळी सोय करावी लागते. आठ-दहा दिवस त्यांच्याबरोबर. दौरे.. मीटिंग.. माती.. लग्न... साहेब समीरला घेतल्याशिवाय मतदारसंघात जातच नाहीत. दौरा संपला कि साहेब पुन्हा मुंबईला जातात.....
साहेब मंत्री होऊन 2-3 वर्ष झालेली. पंचायतीचं इलेक्शन लागलं. समीरच तिकीट फीक्स झालं. पण तिथ आरक्षण पडलं. समीर आणि कार्यकर्ते निराश झाले.......
साहेब आले. सर्वांची समजूत काढली. एका लुगड्यानं म्हातारं होत नाही. अजून लांब टप्पा आहे. पुढच्या वेळी नक्की विचार करू. कार्यकर्ते जोमानं कामाला लागले. मतदान झाले. पंचायतीमध्ये साहेबांच्या गटाला घवघवीत यश मिळाले......
दिवस असेच जात होते. एक संपली कि दुसरी निवडणूक येत होती. समीरच्या मागचे काम संपत नव्हते. समीरला 2 मूलं झाली. दोन एकर डाळींब बाग काढून टाकावी लागली. पी.डी.सी.सी. बँकेचे दीर्घ मुदतीचे कर्जहि होते. घरी थकलेले वडील. आजारी आई. दोन पोरांचा शाळेचा खर्च. पण परवडत नव्हतं. साहेबांच्या शब्दानं कर्जे मिळत होती.......
समीरचं गावात वजन होत. वर्गमित्र मुंबई पुण्याला नोकरी, व्यवसायास गेलेले. ते इनोव्हा गाड्या घेऊन गावाकडं यायचे. समीरला भेटायचे. नमस्कार करायचे. म्हणायचे आमच्या बदलीचं तेवढं साहेबांना बोला. तुमच्या शब्दाला मान आहे... तुमचं वजन आहे. समीरची छाती फुगायची......
तोंडावर झेड.पी. ची निवडणूक आलेली. जागा ओपनच हो! कुठलीच अडचण नव्हती. समीरच्या तिकिटाचं जवळ जवळ नक्कीच. अचानक एके दिवशी साहेबानी समीरला मुंबईला बोलवलं. समीरला खूप बरं वाटलं. समीर मुंबईला गेला. एसी चेंबर मध्ये शिरला. साहेबानी चहा, नाष्टा मागवला. झेड.पी. चा विषय काढला. यावेळी खुप टफ निवडणूक आहे. दुसर्‍या गटाने खुपच उचल खाल्लीया. आपल्याला तगडा उमेदवार पाहीजे. खरं तर समीरचाच नंबर आहे. पण पैशाचा प्रश्न आहे. पक्ष आणि मी आहेच. पण उमेदवाराने स्वतः 15 ते 20 लाख घातले पाहिजेत. समीरची परिस्थिती नाही. म्हणून एवढ्या वेळी समीरनं गप्प बसावं. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माझ्याही अस्तित्वाचा सवाल आहे. पुढच्या झेडपीला समीरचाच नंबर असणार. माझा शब्द आहे......
साहेबांचं खरं होतं. आजकाल पैशाशिवाय निवडणूक नाही. समीरच्या जागी सचिनराव उभे राहिले. गावाकडे येऊन कार्यकर्ते प्रचाराला लागले. समीरने पुन्हा पायाला भिंगरी बांधली. सचिनराव 10 हजार मताने निवडून आले......
समीरची पोरं आता मोठी झालेली. गेल्या वर्षी वडील गेले. धाकला पोरगा कॉलेजला होता. थोरला पोरगा पुण्याला प्रायव्हेट जॉब करीत होता. त्यालाही गव्हर्मेंटमध्ये चिकटवणार असा साहेबांनी शब्द दिलाय. डी.सी.सी  बँकेचे कर्ज दुप्पट झालेलं. शिल्लक राहिलेली बाग फेल गेलेली. पण एकदा पोरं नोकरीला लागली कि, महिन्याला लाखभर रुपये येतील. कर्ज काय फीटून जाईल. मग बायकोला चार दागिने घेता येतील. घराची डागडुजी करता येईल. बागपण वाढवता येईल. शिवाय येणार्‍या निवडणुकीत आपणच उमेदवार. साहेबांनी शब्द दिलाय. आता कल्ले पांढरे झाले. टक्कल पडलं. कार्यकर्ते विचारतात, समीर तात्या तब्बेत कशी आहे? वय झाल्यासारखं वाटतंय. जेष्ठ कार्यकर्ता म्हणून तरी साहेब नक्कीच तिकीट देणार.......
अलीकडे साहेबांचे चिरंजीव पण राजकारणात उतरले आहेत. धाकलं साहेब अलीकडं प्रत्येक कार्यक्रमात येतात. भाषण करतात. गरिबांची सेवा करणारं आमचं घराणं आहे म्हणतात. कोणाचे काम असेल तर डायरेक्ट मंत्र्यांना फोन करतात. त्यांच्याबरोबर नेहमी 10-20 कार्यकर्ते असतात. 
वर्षभरातच झेड.पी. ची निवडणूक जाहिर झाली. उमेदवारीसाठी समीरच अग्रेसर होता. जेष्ठ म्हणून. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून. 
एके दिवशी साहेबांनी समीरला बोलावले. म्हणाले, आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा समीर कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू.
 साहेबांची अवस्था बघून समीरला भरून आलं. समीरनं साहेबाना ठामपणे सांगितलं, धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........
समीरला उदास वाटत होतं. 
हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली. घरदार उध्वस्त झालं. पोरगा निवडून येणार या आशेवर बाप मरून गेला. बायका पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे मित्र प्रगती करुन कुठल्या कुठं गेले. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक. विश्वासू साथीदार.
घरात नाही ज्वारीचा दाणा आणि आणि पुढारी उताणा, अशी अवस्था. 
उद्या पोरांनी विचारलं तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं ???????
समीरला सकाळी उशिरा जाग आली ती धाकल्या साहेबांच्या हाकेनं. समीर जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबानी पाय धरले. म्हणाले, तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणूनच राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे. धाकल्या साहेबानी पुन्हा एकदा पाय धरले. समीरने त्यांना उठवले......
धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी समीर नावाचा कार्यकर्ता कामाला लागला. त्याने पुन्हा पायाला भिंगरी बांधली.....
विचार करा मित्रांनो....., नेत्यांची मुलं नेतेच होणार आहेत नि कार्यकर्त्यांची मुलं कार्यकर्तेच राहणार आहेत....!
नाही तर.....
उचला सतरंज्या.....
राजकारणात कार्यकर्त्यांचे व त्यांच्या मुलांचे शेवटी काय होते? राजकारणात कार्यकर्त्यांचे व त्यांच्या  मुलांचे शेवटी काय होते? Reviewed by News1 Marathi on June 29, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads